Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 

भस्मासूर

September 22, 2012

तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी यांनी केंद्रातील संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारला दिलेला पाठिंबा काढून घेतानाच सपाचे मुलायमसिंग यांनी जातीयवादी पक्षांना (पक्षीः भाजपा) सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी, असे म्हणत सरकारला पाठिंबा दिला आहे. त्याचवेळी भाववाढ व एफडीआय या मुद्यांवर आपला पक्ष सरकारच्या धोरणात विरोधाची भूमिका कायम ठेवेल, असे त्यांनी स्पष्ट करत आपला पाठिंबा सहजासहजी नसल्याचे अप्रत्यक्षरित्या संकेत दिले आहेत. संतप्त भाजपाने मात्र सरकारची घटिका भरल्याचे सांगत एफडीआयच्या मुद्यावर सरकारने संसदेत दिलेले वचन मोडून विश्वासघात केल्याचा आरोप मनमोहनसिंग यांच्यावर केला आहे.

त्याचवेळी देशात तिसरी आघाडी अस्तित्वात येण्याची शक्यता राजकीय विश्लेक्षकांकडून व्यक्त केली जात आहे. डाव्या पक्षांना सोबत घेऊन काँग्रेस, तसेच भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी सपाची चाचपणी सुरू असल्याचे दिल्लीतील सूत्रांनी सांगितले आहे. या आघाडीचे नेतृत्व मुलायमसिंह यांच्याकडेच राहील, असेही सूत्रांनी स्पष्ट केले आहे. थेट विदेशी गुंतवणुकीला (एफडीआय) विरोध करणारा प्रस्ताव संसदेत मांडण्यात आला तर त्याला विरोध करणार नाही, असे मुलायमसिंह यांनी सांगितल्याने काँग्रेसप्रणित संपुआ सरकार पेचात सापडले आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मुलायमसिंह म्हणाले, की ममता बॅनर्जी धर्मनिरपेक्ष आहेत. त्यांनी संसदेत एफडीआयविरोधात प्रस्ताव मांडला, तर त्याला समाजवादी पक्ष विरोध करणार नाही. आमचा त्याला पाठिंबा राहिला. आम्ही यावर संसदीय समितीची बैठक घेणार आहोत. या विषयावर आमच्या मताशी अनुकूल असलेल्या पक्षांसोबत चर्चा केली जाईल. आमच्या पक्षाकडूनसुद्धा एफडीआयला विरोध करणारा प्रस्ताव ठेवला जाऊ शकतो. आम्ही सरकारच्या जनतेविरोधी धोरणांचा विरोध करणार असून जनमत तयार करणार आहोत.

तिसरी आघाडी प्रत्यक्षात आली, तरी ती 2014च्या लोकसभा निवडणुकीनंतरच, असे मुलायसिंह यांनी सांगितले असले, तरी त्यांनी शनिवारी घेतलेल्या राजकीय भेटीगाठींमुळे काँग्रेसविरोधी मुलायम आघाडीबाबत राजधानीत तर्कवितर्क केले जात होते. तशातच त्यांनी राष्ट्रपती भवनाला भेट दिल्याने चर्चेला आणखीनच उधाण आले. त्याचवेळी संपुआकडे पुरेसे संख्याबळ असल्याचा दावा पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची भेट घेऊन केल्याने काँग्रेसची कोंडी झाल्याचे स्पष्ट होत असल्याचे सूत्राने सांगितले आहे.

उत्तर प्रदेशातून ऐंशी खासदार संसदेत जातात, असे सांगत मुलायमसिंग यांनी अप्रत्यक्षरित्या काँग्रेसला इशारा दिल्याचेच मानले जात आहे. त्यामुळेच तिसरी आघाडी निवडणुकांपूर्वीच प्रत्यक्षात येण्याची शक्यता बळावल्याचेही या सूत्राने स्पष्ट केले आहे. तृणमूलने पाठिंबा काढून घेतल्याने 271चा बहुमताचा आकडा पूर्ण करण्यास काँग्रेसला सतरा जागा कमी पडत होत्या. त्याचवेळी बसपा (21), सपा (22) यांनी पाठिंबा दिल्याने संपुआकडे बहुमतासाठी आवश्यक पुरेसे संख्याबळ झाले आहे.

पाठिंबा दिल्यानंतर काही तासांतच मुलायमसिंह यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना एफडीआयच्या प्रश्नावरून आपला सरकारला विरोधा राहील. हा निर्णय मागे घेण्यास आम्ही सरकारला प्रसंगी भाग पाडू, असेही ठणकावून सांगितले. त्याचवेळी निवडणुकांसाठी सपा तयार असल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले आहे. संपूआ सरकार आपला कार्यकाल पूर्ण करणार का, या प्रश्नावर उत्तर देताना त्यांनी ते सरकारच्या ध्येयधोरणांवरती अवलंबून असल्याचे सांगत संपूर्ण जबाबदारी काँग्रेसवरतीच टाकली आहे.

माकपचे सरचिटणीस प्रकाश करात यांनी मुलायमसिंह यांनी पुढाकार घेत तिसरी आघाडीची निर्मीती केल्यास आपला त्यांना पाठिंबा राहील, असे सांगितल्याने मुलायम आघाडीची प्रत्यक्षात येण्याच्या शक्यतेत वाढ झाली आहे. तेलगु देशमचे चंद्राबाबू नायडू यांनीही मुलायमसिंग यांना पाठिंबा दिल्याचे राजधानीतून वृत्त आहे. काँग्रेस, तसेच भाजपाला सत्तेवर येण्यापासून रोखण्यासाठी, तसेच निवडणुका टाळण्यासाठी डाव्यांसह सर्वच पक्ष पुढे सरसावले असून सरकारने एफडीआयचा निर्णय मागे न घेतल्यास कोणत्याही क्षणी मुलायमसिंह राष्ट्रपतींना भेटून सरकार स्थापनेचा दावा करतील, अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे.

मुलायमसिंह यांचे राजकारण काँग्रेसने इतक्या वर्षांत समजून न घेताच, त्यांचा पाठिंबा घेऊन भस्मासूर जन्माला घातल्याचे या साऱ्या घटनाक्रमातून स्पष्ट होत आहे. जातीयवादी शक्तींना म्हणजेच भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठीचा जप कायम ठेवत 1991 पासून मुलायमसिंह यांनी कायम काँग्रेसला वेळप्रसंगी मदत केली आहे. डाव्या पक्षांचीही तिच विचारधारणा असल्याने त्यांनीही काँग्रेससोबत राहणे आजपर्यंत पसंद केले आहे. त्यामुळेच त्यावेळी अयोध्येतील श्रीरामजन्मभूमीवरील वादग्रस्त ढाचा कारसेवकांनी पाडल्यानंतरही नरसिंह राव यांचे सरकार गडगडले नाही. एफडीआयच्या विरोधात सरकारच्या विरोधात भूमिका घेणाऱ्या मुलायमसिंह यांनी 24 तासांतच काँग्रेसचे सरकार अल्पमतात येताच त्याला पाठिंबा जाहीर केला. काँग्रेसपेक्षा मुलायमसिंह हे जास्त सत्तापिपासू आहेत. ममता बॅनर्जी या हेकेखोर असल्या, तरी त्यांच्या महत्त्वाकांक्षा त्यांच्या राज्यापुरत्या सिमित आहेत.

काँग्रेस आपल्याजवळील ‘सीबीआय’ शस्त्राचा वापर करून मुलायमसिंह यांना रोखण्याचे स्वप्न पहात असेल, तर काँग्रेस मुर्खांच्या नंदनवनात राहत आहे, असेच दुर्दैवाने म्हणावे लागेल. पंतप्रधानपदाचे स्वप्न गेली दोन दशकांहून अधिक काळ त्यांनी पाहिले आहे. सपाच्या खासदारांच्या संख्याबळाच्या ऑक्सिजनवर ते काँग्रेसी सरकारला काही काळ सत्तेवर ठेवतील. मात्र, आता त्यांना पंतप्रधानपद खुणावत आहे. त्यांची सर्वोच्च राजकीय महत्त्वाकांक्षा डाव्या पक्षांच्या पाठिंब्यावर पूर्ण होईल, असे संकेत मिळाले आहेत. त्यांनी ना केवळ डाव्यांशी चर्चा केली, तर रालोआतील घटक पक्ष अकाली दलाशी चर्चा करून काँग्रेस, भाजपाशिवायचे सरकार प्रत्यक्षात आणण्यासाठीच्या सर्व शक्यता तपासून पाहिल्याचेही सांगण्यात आले आहे. तसेच बीजेडीच्या नवीन पटनाईक यांच्याशीही त्यांनी चर्चा केली असल्याने रालोआच्या गोटातही काळजीचे वातावरण आहे.

माकपचे पॉलिट ब्युरो सदस्य सीताराम येच्युरी या अभ्यासू नेत्याने केलेले व्यक्तव्य नोंद घेण्यासारखे आहे. ते म्हणतात, काँग्रेसचा एफडीआयच्या निर्णयामुळे देशातील उद्योगजगतात आनंदाचे वातावरण असेल. मात्र, सर्वसामान्य जनतेचे जगणे असह्य होणार आहे. सरकारला एमएनसी कंपनींची काळजी आहे, परंतु देशातील सामान्य माणसाच्या हिताची काँग्रेसी सरकार काळजी घेत नाही, असा आरोपही त्यांनी केलाय.

पंतप्रधानांनी एफडीआयच्या, तसेच डिझेल भाववाढी समर्थनार्थ केलेल्या स्पष्टीकरणाचीही खिल्ली उडवत, ते नवीन काय बोलले, असा प्रश्न उपस्थित केला आहे. ते नवे असे काहीच बोललेले नाहीत. त्याच-त्याच गोष्टी उगाळून ते आपल्या चुकीच्या निर्णयांचे समर्थन करीत आहेत. तेल कंपन्या नफा दाखवत असताना, डिझेलची किंमत वाढविण्याची काहीही आवश्यकता नव्हती. जगभरात मंदीचे वातावरण असताना, हिंदुस्थान प्रगती करण्याकडे वाटचाल करत असताना भाववाढ करून देशाच्या प्रगतीला पंतप्रधानच अडथळा आणत आहेत. किंमती वाढल्याने सर्वसामान्यांची क्रयशक्ती कमी होणार आहे, असा त्यांनी आरोप केला आहे.

पैसे झाडावर उगवत नाहीत, हे लहान मुलालाही कळते. प्रश्न हा आहे की, पैशांचे तुम्ही काय करणार आहात. तुमच्यापाशी 5 लाख 28 हजार कोटी रुपये आहेत. त्याचवेळी तूट 5 लाख 22 हजार कोटींची आहे. ही तूट भरून काढण्यासाठी सर्वसामान्यांच्यावर तुम्ही भार टाकताय. ‘आम आदमी’साठी काँग्रेसी सरकार काहीही ठोस उपाययोजना राबवत नसल्याबाबत त्यांनी खंत व्यक्त केली आहे.

एकंदरित काँग्रेसी सरकारने घेतलेले निर्णय कोणालाही मान्य नसल्याने एकतर मुलायम आघाडी केँद्रात सत्तेवर आली, तर आश्चर्य वाटणार नाही. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशात सपाने लक्षणीय यश मिळविल्याने निवडणुका लागल्याच, तर लोकसभा निवडणुकीत त्या यशाची पुनरावृत्ती करून सपा आपल्या लोकसभांच्या जागा वाढविण्यासाठी निश्चितच प्रयत्न करेल. आता पाठिंबा देत त्यांनी काँग्रेसला तात्पुरते जीवदान दिले असले, तरी मुलायमसिंह यांना पंतप्रधानपद खुणावू लागल्याने ते तिसऱ्या आघाडीच्या स्थापनेच्या प्रयत्नात आहेत. त्यासाठी त्यांनी रालोआतील घटकपक्षांनाही सोबत घेण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.

काँग्रेसने निवडणुका टाळण्यासाठी मुलायमसिंह या पंतप्रधानपदाच्या लालसेने पछाडलेल्या अतिमहत्त्वाकांक्षी व्यक्तीला केंद्रीय राजकारणात सक्रीय करून भस्मासुराला जन्म दिला आहे. या पापाचे फळ काँग्रेसलाच भोगावे लागणार आहे. फक्त ते तिसऱ्या आघाडीच्या रुपात, की मध्यावर्ती निवडणुकांना सामोरे जावून हे येत्या काही काळातच स्पष्ट होईल.

- संजीव ओक

Sanjeev Oak's Blog

Blog Stats
  • 28796 hits