Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 

वॉलमार्टचे वास्तव

September 21, 2012

वॉलमार्ट ही कंपनी वर्षाला जवळपास 600 दशलक्ष टन मालाची उलाढाल करते. मात्र, ही कंपनी फारतर सहा लाखरोजगार देऊ शकते. त्याचवेळी देशातील जी अन्य दुकाने आहेत, त्या दुकानांमधून सहा कोटी जणांना रोजगार मिळतो. अमेरिकेसह अन्य देशांतून वॉलमार्टला मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे.

वॉलमार्टच्या दुकानांमधून विक्रीला असलेला जवळपास 70 टक्के माल हा चीनमध्ये उत्पादित करणाऱ्या सुमारे सहा हजार कंपन्यांनी पुरविलेला असतो. हिंदुस्थानातील 80 टक्के बाजारपेठ ही चीनने यापूर्वीच व्यापलेली आहे. या चीननेच हिंदी-चिनी भाई-भाईचा नारा देत, आपल्या पाठीत खंजीर खुपसला होता. हा चीन आपला क्रमांक एकचा शत्रू असून, तो केव्हा आपल्यावर आक्रमण करेल, याचा आजही नेम नाही.

मनमोहनसिंग यांनी करारावर स्वाक्षरी करताना विदेशी कंपन्यांना हिंदुस्थानी कंपन्यांइतकाच सन्मान देशात दिला जाईल, या कलमाला मंजूरी दिलेली आहे.

21 सप्टेंबर 2005 मध्ये मेक्सिकोत वॉलमार्टने बाजारपेठेवर कब्जा मिळविण्यासाठी 24 दशलक्ष डॉलरची लाच दिल्याचे वृत्त आले. वॉलमार्टने तपास करून या वृत्ताची खातरजमा करून घेतली. एफबीआयच्या एजंटने आपल्या अहवालात, अमेरिकी, तसेच मेक्सिकन कायद्याचा भंग झाल्याचा संशय येण्यास वाव आहे, असे स्पष्टपणे नमूद केले होते. या तपासपथकाने वॉलमार्टने या प्रकरणाची सविस्तर चौकशी करावी, असा सल्ला दिला होता. कंपनीने तो मान्य केला नाहीच. त्याशिवाय सुरू असलेला तपासही पूर्णपणे थांबवला. ज्या अधिकाऱ्याने 2005 साली 24 दशलक्ष डॉलरची लाच दिली होती, त्याला 2008 साली बढती देण्यात आली. वॉलमार्टविरोधात करण्यात आलेले आरोप, तसेच तपासातील तपशील उघड अद्याप उघड करण्यात आलेला नाही, हे विशेष.

हे वृत्त प्रसारमाध्यमांपर्यंत कसे पोहोचले, याचा मात्र वॉलमार्टने कसून शोध घेतला. त्यानंतर कंपनीने सारवासारव करण्यासाठी काही कागदपत्रे प्रसिद्धीसाठी खुले केले. कंपनीच्या काही अधिकाऱ्यांनी वाहिन्यांना मुलाखती दिल्या.

आपल्या व्यवसायवाढीसाठी वॉलमार्ट साम-दाम-दंड-भेद या सर्व मार्गांचा अवलंब करते, असे निरीक्षण ‘द टाईम्स’ने नोंदवले. त्यानंतर लगोलग कंपनीने याबाबत आपण योग्य तो तपास करून संबंधितांवर कारवाई करत असल्याचे सांगितले. त्याचवेळी ‘द टाईम्स’ने मेक्सिकोत कंपनीच्या व्यवसायात लक्षणीय वाढ झाल्याचे, तसेच कर्मचाऱ्यांची संख्या दोन लाखांहून झाल्याचे निरीक्षण नोंदवले. कंपनीचे गोपनीय शंभराहून अधिक कागद त्यांच्या हाती लागल्याने कंपनीतील बहुतांश अधिकारी लाचखोरीच्या प्रकरणी गुंतल्याचे त्यांना आढळून आले. त्यानंतर या वृत्तपत्राने कंपनीचा माजी संचालक सर्जिओ यांची पंधरा तासांच्या मुलाखतीचा अभ्यास केला असता, व्यवसायवाढीसाठी वॉलमार्टने स्थानिक राजकारणी, प्रशासनातील अधिकारी यांना लाच दिल्याचे त्यांनी मान्य केले. कायदा आपल्याला हवा तसा वाकविण्यासाठी कंपनीने सर्व तो परि प्रयत्न केल्याचे त्यांनी सांगितले. ज्या शहरात नवी शाखा उघडायची आहे, त्यासाठीच्या आवश्यक परवानग्या मिळविण्यासाठी, पर्यावरणविषयक कायदे धाब्यावर बसविण्यासाठी वॉलमार्टने मोठ-मोठ्या रक्कमा दिल्याचे त्याने सांगितले. ‘चंद्राची काळी बाजू,’ अशा शब्दात त्याने वॉलमार्टला संबोधले.

मेक्सिकोत वॉलमार्टला नव-नव्या शाखा उघडण्यासाठी सरकारकडून परवानगी मिळाल्याचे हजारो कागद ‘द टाईम्स’च्या हाती लागले. लाच घेतल्यानंतर सरकारी कर्मचाऱ्यांनी वॉलमार्टसाठी वाट्टेल ते, केल्याचे यातून पुढे आले. तसेच कंपनीला वाचविण्यासाठी वॉलमार्टने निष्णात वकीलांची फळीच उभी केल्याचेही यातून पुढे आले.

या प्रकरणातून वॉलमार्ट विस्तारवाढीसाठी कोणत्या थराला जाते, हे समोर येते. मेक्सिकोत गेल्या पंधरा वर्षांत ज्या वेगात वॉलमार्टने आपला व्यवसाय वाढवला, यातून ते ठळकपणे जाणवते. मेक्सिकोच्या दक्षिण सीमेवर प्रत्येक पाच दुकानांमागे एक दुकान वॉलमार्टचे आहे. तसेच कंपनीने 2011 या आर्थिक वर्षांत 29 अब्ज डॉलरची विक्री झाल्याचे आपल्या अहवालात नमूद केले आहे. इतकेच नव्हे, तर 365 नव्या शाखाही या एका वर्षात मेक्सिकोत वॉलमार्टने उघडल्या. अर्थात कंपनी मेक्सिकन सरकारला कररुपात त्यांना मिळणाऱ्या नफ्याच्या प्रमाणात परतावा देत नसल्याचेही उघडकीस आले आहे. कामगार कायद्याचे उल्लंघन करत, कामगारांवरही कंपनी अन्याय करत असल्याने वॉलमार्टविरोधात अमेरिकेत विरोध वाढत असल्याचे, तेथील प्रसारमाध्यमांनी ठळकपणे नमूद केले आहे. एका वाचकाने दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटले आहे की, आपल्याच देशात ही कंपनी कामगारांवर अन्याय करत असून, त्यांना कमीतकमी पगारावर राबवून घेत आहे. वॉलमार्ट तसेच मॅकडोनाल्डसारख्या कंपन्यांनी शंभराहून अधिक देशात आपले जाळे पसरले आहे. त्या नफा कमवत असल्या, तरी त्यांची नैतीक दिवाळखोरी केव्हाच निघालेली आहे. या कंपन्या आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करतात. त्यामुळे अन्य देशांत काय चालते, यावर बोलण्याचा नैतिक अधिकार आपण गमावलेला आहे, ही प्रतिक्रिया बोलकी आहे.

लाच देणे, तसेच घेणे याला अमेरिकेत कडक प्रतिबंध असल्याने 24 दशलक्ष डॉलरच्या लाच दिल्याप्रकरणी कंपनी सावध प्रतिक्रिया देत आहे. कर बुडवेगिरी, तसेच लाचप्रकरणी वॉलमार्टविरोधात कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी जोर धरत आहे, असेही वृत्तात म्हटले आहे.

24 दशलक्ष डॉलर लाचप्रकरणावरून वॉलमार्टची कार्यपद्धती समोर येते. त्यामुळेच अमेरिकेत वॉलमार्टवर सध्यातरी नव्या शाखा उघडण्यावर मोठ्या प्रमाणात निर्बंध आहेत. त्यामुळेच आता या कंपनीला हिंदुस्थानसारखी मोठी बाजारपेठ खुणावत आहे. आपण परकीय गुंतवणुकीला देशात मुभा देताना एक गोष्ट विसरतो. अमेरिकेसारखा देशही आपल्या शेतकऱ्याला जास्तीतजास्त सबसिडी कशी देता येईल, याकडे बारकाईने लक्ष देतो. त्याचवेळी आपल्या देशात शेतकरी मेला, तरी सरकार त्याच्याकडे ढुंकूनही पहात नाही.

स्थानिकांना रोजगार, अशी मागणी लावून धरलेली असली, तरी मुळात अशा आधुनिक दुकानांमधून अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्याने मुळात मनुष्यबळ कमी प्रमाणात लागते. तसेच जे काही लागते, त्यांना वॉलमार्ट अत्यंत कमी मोबदल्यावर राबवून घेते, हे कडवट वास्तव ‘ट टाईम्स’नेच समोर आणले आहे. त्यामुळे रोजगाराच्या संधी, या भ्रमात कोणी राहून, या गुंतवणुकीला कोणीही प्रोत्साहन देता कामा नये.

अमेरिकेत कायदे कडक असूनही तेथे ही कंपनी अमेरिकेला पुरून उरत, करचुकवेगिरी करते, कामगारांचे शोषण करत असेल, लाच देत कायदे मोडून आपल्याला हव्या त्या ठिकाणी शाखा उघडून व्यवसाय करत असेल, तर हिंदुस्थानसारख्या पैसे खाणाऱ्यांच्याच देशात, ती किती थैमान घालेल, याची कल्पनाच करवत नाही.

ही कंपनी सुरुवातीला अविकसित देशांमधून अगदी स्वस्तात माल घेऊन तो आपल्या दुकानांतून कमी किंमतीतून ग्राहकांना उपलब्ध करून देते. यातून बाकीच्या दुकानदारांचे कंबरडे पुर्णपणे मोडले, की वॉलमार्ट बाजारात एकाधिकारशाही प्रस्थापित करून मनमानी पद्धतीने दुकानदारी करते. ज्या-ज्या देशांत वॉलमार्टने आपली दुकानदारी थाटली आहे, त्या देशांत हाच अनुभव स्थानिकांना आलेला आहे.

- संजीव ओक

Sanjeev Oak's Blog

Blog Stats
  • 14839 hits