Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 

मिसाईल सिंचनाचा अचूक भेद

September 25, 2012

एकंदरित काँग्रेससमोरील अडचणी कमी होण्याऐवजी त्या दिवसेंदिवस वाढतच चालल्या आहेत. एफडीआय तसेच महागाईच्या मुद्यावरून ममता बॅनर्जींनी केंद्र सरकारला अडचणीत आणले. सपाच्या मुलायमसिंग यांनी केंद्राला पाठिंबा देत, काँग्रेसी आघाडी सरकारला अल्पमतात जाण्यापासून तारले. त्याचवेळी एफडीआयला आपला विरोध असल्याचे सांगून मुलायमसिंग यांनी काँग्रेसच्या डोक्यावरील अस्थिरतेची टांगती तलवार कायम ठेवली. अशातच महाराष्ट्रात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजीनामा देताच राष्ट्रवादीच्या सर्व मंत्र्यांनी राजीनामे देत, काँग्रेसवर दबाव आणण्यात यश मिळवले आहे.

सरकार अस्थिर झाल्याची चर्चा असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मात्र सरकारला कोणताही धोका नसल्याचा निर्वाळा दिला असला, तरी याबाबतचा निर्णय पक्षश्रेष्ठींचा असतो, असे म्हणत म्हणजे नेमका कोणाचा हे गुलदस्त्यातच ठेवले आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार असताना त्यांचा श्रेष्ठी कोण, याची उकल राजकीय विश्लेषक करत आहेत.

मुळात अजित पवारांनी राजीनामा दिला तो 35 हजार कोटींचा सिंचन घोटाळा उघडकीस आल्याने. जोपर्यंत केवळ आरोप होत होते, तोपर्यंत अजित पवारांना राजीनामा द्यावा, असे वाटले नव्हते. तपासात पारदर्शकता असावी, असे आज ते म्हणत आहेत. मग पहिल्याच वेळी आरोप झाल्यानंतर, तसेच मुख्यमंत्र्यांनी श्वेतपत्रिकेचे मिसाईल डागल्यावर त्याला तोडीस तोड राजीनाम्याच्या क्रूझने उत्तर का दिले नाही, हा प्रश्नही आहेच. वास्तविक मिसाईल सिंचनाने घायाळ झालेल्या पवार काका-पुतण्यांची नाराजी तेव्हाही लपून राहिलेली नव्हती. त्यानंतर राज्यात दुष्काळाचे संकट गडद झाल्याने मध्यंतरी काही काळ सरकार दुष्काळ निवारण्यात मग्न होते. मात्र, पावसाने धरणे भरल्यानंतर पुन्हा एकदा सिंचनाचा प्रश्न ऐरणीवर आला. लगोलग मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा श्वेतपत्रिका काढणार असल्याचे जाहीर केले. त्याचवेळी वृत्तपत्रांतून लेटर बॉम्बने सिंचनातील घोटाळ्यांची रक्कम, त्यांची व्याप्ती, स्वरूप समोर आणल्याने पवार आणि पवार कंपनी अस्वस्थ झाली.

तशी पवार आणि पवार कंपनी मुख्यमंत्रीपदी पृथ्वीराज चव्हाण यांची नियुक्ती झाल्यापासूनच अस्वस्थ होती. कारण आदर्श घोटाळ्यामुळे राज्याची प्रतीमा मलीन झालेली असताना, त्यांना थेट पंतप्रधान कार्यालयातून राज्यात पाठवण्यात आले होते. त्यामुळेच त्यांनी कोणत्याही आमदाराच्या वैयक्तिक फाईल निकालात न काढता, केवळ महत्त्वाच्या प्रश्नांच्या फाईली निकालात काढण्याला प्राधान्य दिले. त्यामुळे काँग्रेसबरोबरच राष्ट्रवादीचीही गळचेपी सुरू झाली. मुख्यमंत्र्यांच्या सहीशिक्क्याशिवाय एकाही योजनेला मंजूरी मिळत नसल्याने ज्यांची वैयक्तिक कामे रखडली जात होती, त्यांच्या गोटात अस्वस्थता पसरली. राजीनामा देतानाही अजित पवारांनी आपणाला झटपट निर्णय घ्यायची सवय आहे, कोणतीही गोष्ट रेंगाळत ठेवायची आपली कार्यपद्धती नव्हे, असे सांगत राजीनामा देण्यामागेच नेमके कारण सांगून टाकले आहे.

त्यामुळेच काँग्रेसवर दबाव आणत, मुख्यमंत्री बदल घडविण्यासाठी राष्ट्रवादीने ही खेळी खेळल्याचे मंत्रालयातून सांगण्यात आले आहे. सध्या काँग्रेस, तसेच राष्ट्रवादीलाही निवडणुका परवडणाऱ्या नाहीत. त्यामुळेच कदाचित पवारांना अपेक्षित असलेले पक्षश्रेष्ठी म्हणजेच, काँग्रेसच्या सर्वेसर्वा सोनिया गांधी यांच्याशी चर्चा करून ते पुढील दिशा ठरवणार, असा घ्यायचा. पवार जेव्हा सरकारला धोका नाही, असे म्हणतात, त्यावेळी ते अडचणीत कसे आणायचे, याचा प्लॅन त्यांच्याकडे तयार असतो, हा आजवरचा अनुभव आहे.

पवार म्हणाले, केंद्रात आणि राज्यात आम्ही सरकारमध्ये असून यापुढेही राहणार आहोत. सरकारला पाठिंबा देण्याचा अथवा सरकारबाहेर पडण्याचा निर्णय राज्यात नव्हे तर केंद्रात होत असतो. सिंचनाच्या कामांबाबत काही अक्षेप येऊ लागल्यानंतर अजित पवार यांनी आपल्या पदाचा राजीनामा देण्याची इच्छा पक्षाकडे व्यक्त केली. असे आरोप होत असताना पदावर राहणे योग्य वाटत नसल्याचे त्यांनी आम्हाला सांगितले. त्यांची भूमिका पटल्यामुळे त्यांना राजीनामा देण्याची अनुमती देण्यात आली. त्यांनी स्वत: घेतलेल्या भूमिकेचा मला अभिमान वाटतो. राज्य सरकारने श्वेतपत्रिका लवकरात लवकर प्रसिद्ध करून याबाबतचे सत्य जनतेसमोर आणावे. शक्य असेल तर ती उद्याच प्रसिद्ध करावी, असेही शरद पवार म्हणतात. तसेच राज्यात अस्थिरता निर्माण करायची नसल्याचे शरद पवारांनी सांगितले. यासंदर्भातील निर्णय घेण्यास पक्षश्रेष्ठी सक्षम असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.

श्वेतपत्रिका कशी काढली जाते, याची माहिती पवारांना नक्कीच आहे. म्हणजेच श्वेतपत्रिका काढणार असाल, तर आमचा पाठिंबा गृहित धरू नका, असे त्यांना सुचवायचे असते. कदाचित आता पवार आणि पवार कंपनीला शांत करण्यासाठी एक समिती नेमली जाईल. नाराजी दूर केली जाईल. कदाचित पृथ्वीराज चव्हाण पुन्हा एकदा पंतप्रधान कार्यालयात किंवा केंद्रीय मंत्रीपद स्वीकारून मोकळे होतील.

पृथ्वीराज चव्हाण यांनी जे मिसाईल सिंचन डागले होते, ते आज फुटले आहे. राजकीय विश्लेषक याला राजकीय भूकंप म्हणत असले, तरी हा केवळ सरकारला दिलेला छोटासा झटका आहे. पारदर्शकतेसाठी राजीनामा अशी अजित पवारांनी भूमिका घेतली असली तरी हा राजीनामा हा घोटाळा निस्तरण्यासाठीच आहे, हेही तितकेच खरे आहे. मिसाईल सिंचनाने नेमका वेध घेतला आहे, इतकाच या राजीनाम्याचा तथ्यांश.

- संजीव ओक

संजय राऊतः अजित पवारांनी राजीनामा अचानक दिलेला नाही. ज्या पक्षाचे प्रमुख शरद पवारांसारखे धुरंधर राजकारणी आहेत, त्या पक्षाचे प्रत्येक पाऊल हे ठरवून केलेली राजकीय खेळी असते. अजित पवार यांचा राजीनामा ही सुद्धा एक खेळी आहे. सरकार अस्थिर करून महाराष्ट्रात पुढले राजकारण करण्याचा हा त्यांचा डाव आहे. जर भ्रष्टाचारासंदर्भात राष्ट्रवादी कॉँग्रेसला इतकीच चाड असती तर पोलिसांनी घरकुल प्रकरणात अटक केलेले आणि सध्या जामिनावर सुटलेल्या गुलाबराव देवकर यांना मंत्रिमंडळात ठेवले नसते. भुजबळ, तटकरे यांच्यावरही भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप आहेत. तेही अजूनही मंत्रिमंडळात आहेत. बाहेरून पाठिंबा देऊन भविष्यात दबावाचे राजकारण करायचे ही राष्ट्रवादी काँग्रेसची योजना आहे.

www.raajmat.wordpress.com

Sanjeev Oak's Blog

Blog Stats
  • 18863 hits